विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांवर कारवाई; यावल पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील बोरावल रस्त्यावर असलेल्या खंडेराव मंदिरासमोरून विनापरवाना गौण खनिजाची  वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांवर मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता कारवाई करत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल पोलीसांनी माहितीनुसार, यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहूल चौधरी हे मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील बोरावल रस्त्यावर असलेल्या खंडेराव मंदिराजवळ गस्तीवर असतांना ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ४० एल ११००) आणि (एमएच १९ एपी ९३८६) या दोन ट्रॅक्टरमधून विनापरवाना गौण खनिजाची चोरटी वाहतूक करत असताना आढळून आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी यांनी कागदपत्रांची मागणी केली असता ट्रॅक्टर चालक रघुनाथ पांडुरंग भिल (वय-४०) आणि दगडू अंबादास भिल (वय-३०) दोघे रा. बोरावल बोरावल गेट, यावल यांच्याकडे गौण खनिज वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करत पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. पो.कॉ. राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

Protected Content