Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोगस व खासगी डॉक्टरांवर कारवाई

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसात झपाट्याने वाढत असून यात मृत्युचे प्रमाण ही वाढत आहे. यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. मात्र, येथील बोगस व खाजगी डॉक्टरांनी टायफाईड सांगून अधिक प्रमाणात सलाईन लावण्यात असल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागत असल्यामुळे या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

यामध्ये काही कोरोना रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला होता. सदर मृत्यूचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. समितीच्या सर्वेक्षणातुन असे लक्षात आले की कोरोना चाचणी न करता स्थानिक पातळीवर टायफाईड सांगून अधिक प्रमाणात सलाईन लावण्यात आल्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागला. सदर घटनेची दखल घेऊन तहसीलदार यांनी खाजगी डॉक्टर व लॅब यांना टायफाईडच्या रुग्णांची आरटीपीसीआर तसेच अँटीजन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सदर नियमांचे पालन काही ठिकाणी होत नाही व काही पॉझिटिव्ह रुग्णांना काही डॉक्टर कोव्हिडं सेंटरची परवानगी नसतांना अधिक प्रमाणात सलाईन लावत असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे आज  तळेगांव येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी जे. व्ही.कवळदेवी यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय पथकाने भेट दिली.

पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मनोज तेली,ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे, कक्षाधिकरी के.बी. पाटील,तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी, आरोग्य सेवक एस.बी. सुर्यवंशी, आरोग्य सेविका दुर्गा जाधव, आशा स्वयंसेविका गीता माळी, रंजना कोळी वाकडी यांचा समावेश होता. पथकाने अचानक भेट दिली असता  आढळून आलेल्या अनियमिततेबाबत त्यांना नोटीस बजाबण्यात आल्या. यामध्ये प्रफुल्ल बोहरा व संतोष पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही.डॉ. स्वप्निल पाटील यांच्याकडे कोणतेही रेकॉर्ड, आवश्यक ते परवाने आढळुन आले नाही तसेच कोरोना चाचणी न करता केवळ टायफाईड ची चाचणी करून अधिक प्रमाणात सलाईन लावत असल्याचे आढळून आले.

प्रशासकीय बाबी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई  करण्याची प्रकिया पूर्ण करण्यात येईल असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.

 

 

 

Exit mobile version