महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोन वर्षांची शिक्षा

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, तीन वर्षानंतर हा निकाल लागला आहे.

याप्रकरणी दि. ५ डिसेंबर २०१८ रोजी कलम ३५४ (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत. बदरखे येथील नितीन सुभाष पाटील याने गावातील एका महिलेचा विनयभंग केल्याने या केसचा निकाल तीन वर्षांनंतर आज दि.२१ डिसेंबर २०२१ रोजी लागला आहे. न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी या गुन्ह्यात आरोपी नितीन पाटील यास दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पाच हजार रुपये दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याचा कारावास वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान, आरोपीतर्फे अॅड. दिपक यांनी काम पाहिले. तर फिर्यादी महिलेतर्फे सरकारी वकील आर. के. माने यांनी काम पाहिले. प्रकरणी कोर्ट पेरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल दिपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.

Protected Content