Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गस्तीवरील तहसीलदार यांच्या पथकातील वाहनाला अपघात !

अमळनेर-लाईव्ळ ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरचे तहसीलदार यांनी अवैध गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी नियुक्त गस्तीवरील पथकाला तहसीलदार यांचे वाहन ९ रोजी रात्री ११ वाजता निघाले असता १० च्या पहाटे तांदळी- कळमसरे रस्त्यावर वळणावर सरकारी वाहन बोलेरो कार पथकातील महसूल कर्मचाऱ्यांसह पल्टी होऊन दोन तलाठी जखमी झाले तर वाहनांच्या काचा फुटून टफ व दरवाजे असे एकूण ८० हजारांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे , याबाबत वाहन चालकाने पोलिसांत खबर दिली आहे

तालुक्यातील तिन्ही बाजुंनी वाहणाऱ्या तापी, पांझरा व बोरी नदीतून सात्री, शहापूर, भिलाली, पाडळसरे, तांदळी, मांडळ, बोहरे, मुडी, निम आदी ठिकाणी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणात वाळू, दगड हे गौण खनिजाची चोरी होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गस्ती व बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यातील गस्तीवरील पथकात मारवडचे तलाठी मनोहर भावसार, शहापूरचे तलाठी गौरव शिरसाट, मंगरुळचे कोतवाल, भटु भदाणे यांच्या टीमला तहसीलदार यांच्या बोलेरो क्रमांक (एमएच १९ सीव्ही ०४१८) या वाहनातून वाहन चालक दिलीप पाटील हे सोमवारी ९ च्या रात्री ११ वाजता निघाले असता, गस्तीवरून कळमसरे ते तांदळी रस्त्यावरील वळण रस्त्यावर अचानक कुत्रे गाडीच्या पुढे आल्याने त्यांना वाचवतांना चालकाने तातडीने ब्रेक लावून वाहन वळविले असता, बोलेरो जागीच फिरून पल्टी होऊन दरवाजाच्या काचा फुटून टफ ही वाकले. यामुळे तहसीलदार यांच्या वाहनाचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून वाहन चालक दिलीप पाटील यांनी सायंकाळी मारवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे, सुदैवाने या वाहनात तहसीलदार नव्हते मात्र तलाठी गौरव शिरसाट व मनोहर भावसार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली. तहसीलदार यांचे वाहन पल्टी होऊन दिवस उजाडत नाही तोवर जागेवर उभ्या अवस्थेत नुकसानग्रस्त स्थितीत अनेकांनी पाहिले या अपघाताबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Exit mobile version