अतिक्रमित घरे नियमानाकुल करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवा – आमदार किशोर पाटील

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमानाकुल करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवा अशा सूचना आमदार किशोर पाटील यांनी दिल्या आहेत.

शासन निर्णयाप्रमाणे सन २०११ पूर्वीचे पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती आली असून पाचोरा शहरातील सुमारे साडेतीन हजार तर भडगाव शहरातील सुमारे तीन हजार अतिक्रमीत धारकांना याचा लाभ मिळणार आहे.

याबाबत आज शुक्रवार दि.१४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत मोजणी प्रक्रियापूर्ण करणेकामी दोन्ही पालिकांनी तातडीने मोजणी रक्कम भरावी तसेच भूमिअभिलेख कार्यालयाने देखील तातडीने मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी आ. किशोर पाटील यांच्यावतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, पाचोरा तालूका भूमिअभिलेख अधिकारी आर.एस.घेटे, भडगाव तालूका भूमिअभिलेख अधिकारी सय्यद यांचेसह पाचोरा मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, बांधकाम विभागाचे प्रकाश पवार, पाचोरा नायब तहसिलदार संभाजी पाटील, भडगाव येथून नायब तहसिलदार देवकर, बांधकाम विभागाचे नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.

बैठकीत पाचोरा शहरातील घरांसाठी आकारलेली सुमारे ९० लक्ष मोजणी फी शासनाकडून कमी करून आता ४५ लक्ष रुपये पाचोरा पालिकेने तातडीने भरण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दिले असून आगामी महिन्याभरात मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्धिष्ट देण्यात आले आहे. भडगाव पालिकेला देखील प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.

दरम्यान पालिकेने मोजणी फी भरल्यानंतर तातडीने ई.टी.एस. मशिनद्वारे मोजणी प्रक्रिया राबवली जाईल. तसेच गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया पाचोरा भूमीलेख अधिकारी एस.आर.घेटे यांनी दिली आहे. यामुळे अतिक्रमण धारकांचे आपल्या हक्काचे घर आता नावावर होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

Protected Content