Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अबब… रूग्णाच्या पोटातून काढला चार किलोचा गोळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोटदुखीचा त्रास घेऊन आलेल्या रुग्णाच्या पोटातून चार किलोचा गोळा काढून त्याला जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी ६० वर्षीय भास्कर बारी यांना गेल्या वीस वर्षांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास होत होता. त्यांना हर्निया असल्याबाबत संशय होता. म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारासाठी ते दाखल झाले. त्या ठिकाणी शल्याचिकित्सा विभागाने निदान केल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा असल्याचे समजले. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होता.

गोळा काढणे गरजेचे होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून चार किलो वजनाचा गोळा काढला. यानंतर रुग्णाला दिलासा मिळाला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक व युनिट प्रमुख डॉ. रोहन पाटील, डॉ. सुनील गुट्टे यांनी रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांचे  मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. महेंद्र मल, डॅा. रोशन पाटील, डॅा. हर्षा चौधरी, बधीरीकरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. कुणाल सूर्यवंशी यांच्यासह कक्ष क्रमांक ७ च्या इन्चार्ज परिचारिका सुरेखा महाजन यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सदर रुग्णाला जीवदान देण्यात यश मिळाल्याबद्दल शल्य चिकित्सा विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version