Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंगणवाडी सेविकांची कोविडच्या कामातून होणार मुक्तता- यशोमती ठाकूर

मुंबई प्रतिनिधी । कोविड सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मान्य केली आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांची या कामातून मुक्तता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ विषाणू सर्वेक्षणच्या कामातून वगळण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी मान्य केली असून त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेने नुकतेच विविध मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या अनुषंगाने ठाकूर यांनी निर्देश दिल्याप्रमाणे एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

मार्चपासून कोविड-१९ प्रादुर्भावास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ च्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. या कामामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. बालके, गरोदर महिला, स्तनदा माता या संवेदनशील घटकांसाठी अंगणवाडी सेविका काम करत असल्याने कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते. तथापि, कोविड सर्वेक्षण जबाबदारीमुळे या कामावर परिणाम होत होता. तसेच या सर्वेक्षणदरम्यान दुर्दैवाने अंगणवाडी सेविकेस कोविडचा संसर्ग झाल्यास तिच्यापासून शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांनाही कोविड संसर्गाचा धोका उदभवू शकतो. हे लक्षात घेता अंगणवाडी कार्यक्षेत्रातील ६ वर्षे वयापर्यंतची बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्याशी संबंधित सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी सेविकांना देण्यात यावे; जेणेकरून लहान बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग आणि या गटातील बालके आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांच्यातील कोविड सर्वेक्षणाचे काम करता येईल याप्रमाणे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे.

Exit mobile version