Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोर्टाच्या दणक्याने एका दिवसात मिळाले जातवैधता प्रमाणपत्र

जळगाव प्रतिनिधी । आदिवासी ठाकूर समाजाच्या विद्यार्थ्याला न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एका दिवसात जातवैधता प्रमाणपत्र मिळाले असून त्याचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ येथील किरण बाबूलाल ठाकूर यांचा मुलगा वेद याने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून तो वैद्यकीय अथवा औषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहे. मात्र नियमानुसार त्याला आदिवासी ठाकूर समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. त्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासी विकास खात्याकडे जातवैधता प्रमाणपत्र ( व्हॅलिडिटी सर्टफिकेट) मिळावे म्हणून अर्ज केला होता. मात्र संबंधीत खात्याच्या अधिकार्‍यांनी टोलवाटोलवी केली. यातच एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी मोजके दिवस हाती उरल्यामुळे किरण ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबात खंडपीठात धाव घेतली होती. यावर दिनांक १६ जुलै रोजी एस.सी. धर्माधिकारी आणि संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले.

या सुनावणीत संबंधीत विद्यार्थी हा भुसावळातील सेंट अलाँसियस विद्यालयात शिकला असून त्याचे वडील हे भुसावळचे रहिवासी असल्याचे न्यायालयाने मान्य केले. तसेच त्याचे पूर्वज हे आदिवासी ठाकूर समाजाचे असल्याचे सर्व पुरावेदेखील सादर करण्यात आले होते. तसेच त्याच्या वडिलांचे जातवैधता प्रमाणपत्रसुध्दा सादर करण्यात आले होते. मात्र असे असूनही संबंधीत खात्याच्या अधिकार्‍यांनी चालढकल केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबत संबंधीत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एका दिवसात म्हणजे १७ तारखेपर्यंत व्हॅलीडिटी प्रमाणपत्र जारी न केल्यास आदिवासी विकास विभागाच्या तिनही संचालकांना एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा न्यायालयाने आपल्या निकालातून दिला.

दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे धास्तावलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी एका दिवसात संबंधीत विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र दिले. यामुळे त्याचे संभाव्य नुकसान टळले आहे. जातवैधता प्रमाणपत्र देतांना विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड पिळवणूक केली जाते. या पार्श्‍वभूमिवर, हा निकाल पथदर्शी ठरू शकतो.

Exit mobile version