Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाय घसरून पडल्याने खेडी खुर्द येथील तरूणाचा मृत्यू

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  घरात पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे खेडी खुर्द येथील ३७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

दीपक प्रभाकर पाटील (वय-३७) रा. खेडी खुर्द ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत नातेवाईकांकडून मिळलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील दीपक हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दीपक हा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने तो घरीच होता. त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली असल्याने दीपकने सोमवारी रात्री खालच्या मजल्यावर राहत असलेल्या आपल्या आई-वडीलांकडे जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजले तरी दीपक  उठला नसल्याने त्याचे वडील दीपक झोपलेल्या ठिकाणी गेले. याठिकाणी दरवाजा आतून बंद असल्याने त्याच्या वडीलांनी खिडकीतून बघितले असता, दीपक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

 

आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला  मयत घोषित केले. त्याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. पाय घसरून पडल्याने दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version