Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डेंग्यूच्या आजाराने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील १९ वर्षीय तरुणाचा डेंग्यू विषाणूमुळे उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  यामुळे शिरसोलीत आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण झालेले नाही. तसेच पाण्याच्या टाकीखाली सांडपाण्यामध्ये डेंग्यूच्या विषाणू वाढल्याने तरुणाला त्याची बाधा झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

देवेंद्र विकास बारी (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, बारी नगर शिरसोली प्र.बो. ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती  त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

 

प्रसंगी गावात माहिती कळताच गावकऱ्यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतकडून गावात फवारणी आणि साफसफाई सुरू असल्याची माहिती सरपंचांनी दिली. मात्र ज्या ठिकाणी तरुण राहतो तिथे पाण्याच्या टाकीखाली आजूबाजूच्या घराचे सांडपाणी साचते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरला आहे. डेंग्यू विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान शिरसोली गावामध्ये दोन आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच फिरता आयुर्वेदिक दवाखाना देखील आहे.

 

मात्र त्यांच्या वेळा मर्यादित असल्यामुळे तसेच तिथे मनुष्यबळ तोकडे असल्या कारणाने तेथे ग्रामस्थांना पुरेशी आरोग्यसेवा मिळत नाही. तरुणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना माहिती कळताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गावातील आरोग्य कर्मचारी वेळेवर न येणे टाईमाच्या आत दवाखाना बंद असल्याने नागरिकांन मध्ये नाराजी आहे. डेंग्यू मुळे तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात माहिती घेण्याचे काम म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश अग्रवाल यांनी सुरू केले असून पथक पाठवणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. डेंग्यू मलेरिया बाबत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण आजवर झालेले नाही.

 

जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज डेंग्यू सदृश्य आजाराचे वीस ते पंचवीस रुग्ण दाखल होत आहेत. त्यातील काही रुग्ण ॲडमिट करावी लागत आहेत.असे असताना देखील आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे या घटनेनुसार दिसून आले आहे. केवळ शिरसोली पुरता सर्वेक्षण न करता पूर्ण जळगाव तालुका व जिल्ह्याचे सर्वेक्षण झाले पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version