Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

७ अन् ८ सप्टेंबरला दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी । विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक ७ व ८ सप्टेंबरला होणार आहे. कामकाज सल्लागार समितीने याबाबात आज निर्णय घेतला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून ७ व ८ सप्टेंबरला पावसाळी अधिवेशन होणार आहे. शोक प्रस्ताव, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे. यामध्ये ७ शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली. कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपील पाटील आदी उपस्थित होते.

दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट दिले जाईल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सदस्यांच्या पीएना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही मात्र त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहनचालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे.

Exit mobile version