Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाना-अप्पांची कट्टी आणि भाजप-राष्ट्रवादीची भट्टी !

पाचोरा प्रतिनिधी । आगामी निवडणुकांचे फटाके फुटण्यास आतापासूनच सुरूवात झाली असून भाजप व शिवसेनेतील आगामी कालखंडातील संघर्षाची चुणूक दिसली आहे. तर या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची जमलेली भट्टी ही अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरू होण्यास थोडा अवकाश असला तरी सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक आतापासूनच इलेक्शन मोडमध्ये शिरल्याचे दिसून येत आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे शिवसेना व राष्ट्रवादी या पारंपरीक प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना भाजपरूपी तिसरा पर्याय आकारास येऊ लागला आहे. शिवसेनेशी युती झाल्यास पडद्याआड आणि युती न झाल्यास उघडपणे मैदानात उतरण्याची तयारी भाजपने केली आहे. विशेष करून जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी येथे खास लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. तर आमदार किशोरआप्पा पाटीलदेखील आव्हान स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे. हे सारे होत असतांना आता याला लोकसभा निवडणुकीचा आयामदेखील जुडला आहे. यातच सोमवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेकडे खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिधींना पाठ फिरवून चुणूक दाखवून दिली आहे. याच्या मागील कारणे हे भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारे आहेत.

किशोरआप्पांचे काका आर.ओ. तात्या पाटील हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. यामुळे युती होऊ नये अशी त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. असे झाल्यास लोकसभेच्या रिंगणात ते ए.टी. पाटील यांच्यासमोर उभे ठाकतील हे निश्‍चित आहे. यामुळे अगदी उघडपणे आव्हाने-प्रति आव्हानांचा खेळ रंगण्यास प्रारंभ झाला आहे. आगामी दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याची ही झलकच मानावी लागणार आहे. या प्रकारचा सामना थेट रंगला तर भाजप आणि शिवसेनेत उघड टक्कर होणार असल्याचे स्पष्ट आहे. युती झाली तर मात्र पडद्याआड शह-काटशहाचे राजकारण रंगेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाही.

पाचोरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांची भाजपसोबत असणारी सलगी कुणापासून लपून राहिलेली नाही. यामुळे लोकसभेत युती होऊन ए.टी. पाटलांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेना अगदी मनापासून काम करेलच याची शाश्‍वती नाही. आणि या निवडणुकीत भाजपला दगा-फटका झालाच तर विधानसभेत याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपकडून रसद पुरविण्यात येईल. अर्थात, दोन्ही स्थितींमध्ये लाभ राष्ट्रवादी काँग्रेसलाच होण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही घरचा पाहुणा अनेकदा उपाशी राहण्याची उदाहरणेदेखील आहेत. यामुळे राष्ट्रवादीने मरगळ झटकून टाकत मुरब्बीपणे पावले उचलली तरच भाजप-शिवसेनेतील फुटीचा त्यांना लाभ मिळेल. अन्यथा, या पक्षाच्या नशिबात तिसरा क्रमांक असेल हे निश्‍चीत.

Exit mobile version