Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यावरणाकडे पाहण्याचा हवा अध्यात्मिक दृष्टीकोन

 

फैजपूर,प्रतिनिधी । मानवी जीवन सुखकर होण्यासाठी पर्यावरणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. याच पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी त्याकडे पाहण्याचा अध्यात्मिक दृष्टीकोन असायला हवा असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा कार्यकारिणीचे नियुक्ती पत्र महामंडलेश्वर यांचे हस्ते पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मस्थळ मंदिर बांधकाम भूमिपूजनप्रसंगी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केलेल्या महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा सत्कार बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील व प्रा. उमाकांत पाटील यांनी केला.

महामंडलेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष नाना पाटील, सचिव संजय ताडेकर, मनीषा ताडेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. उमाकांत पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, रवींद्र खरादे, लीलाधर वानखेडे, संजीव बोठे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या आशिर्वचनात प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माणामुळे रामभक्तांचे स्वप्न साकार होत असून संपूर्ण जगभर धर्म व अध्यात्माचा सकारात्मक संदेश गेला असल्याचे सांगितले. तसेच निसर्ग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. सूत्रसंचालन प्रा. उमाकांत पाटील यांनी तर आभार डॉ. जगदीश पाटील यांनी मानले.

Exit mobile version