Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळंत महिलेला ट्युमर, पोटातून गोळा काढून वाचवला जीव !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात वैद्यकीय पथकाचे यश 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाळंत महिलेला ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यानंतर शल्यचिकित्सा विभागाने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून मोठा गोळा काढत सदर महिलेचा जीव वाचविण्यात यश मिळविले. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

यावल येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिला ह्या गरोदर होत्या. त्यावेळी त्यांच्या पोटात बाळासह एक मोठी गाठ वाढत असल्याचे खाजगी दवाखान्यात सांगण्यात आले होते. या महिलेची प्रसूती नॉर्मल झाल्यावरही हि गाठ कमी झाली नव्हती. तेव्हा खाजगी दवाखान्याने शस्त्रक्रिया सांगून खर्च सांगितला. मात्र खर्च परवडणार नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे शल्यचिकित्सा विभागात डॉ. प्रशांत देवरे यांनी महिलेच्या वैद्यकीय चाचण्या केल्या. रुग्णाला मोठ्या आतडीच्या गाठीचे निदान झाल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानंतर मोठ्या आतडीचे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला दोन थैल्या रक्त लागले व गाठ काढून आतडीचा मोठा भाग शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जोडून रुग्णास अतिदक्षता विभागात निगराणीखाली ठेवण्यात आले. आज रुग्ण ठणठणीत बरा झाला असून महिलेचा जीव वाचला आहे.

डॉ. देवरे यांना शल्यचिकित्साशास्त्र विभागातील डॉ. समीर चौधरी, डॉ. ज्ञानोबा होळंबे, डॉ. विपीन खडसे, डॉ. जिया उल हक यांच्यासह भूलशास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. राजेश सुभेदार, विकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक शेजवळ, शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी, आयसीयूच्या इन्चार्ज राजश्री आढाळे यांचे उपचारकामी सहकार्य लाभले. तर शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले.

Exit mobile version