Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावर अचानक पडून एका प्रवाशाचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. या प्रवाशाचे नाव मनोज कुमार आहे. तो सायंकाळी ६.३० वाजता स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होता. त्यावेळी तो अचानक जिन्यावर पडला. स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने त्या प्रवाशाला स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. तिथे कक्षातील डॉक्टर आणि परिचारिकेने या प्रवाशावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. या प्रवाशाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. याचबरोबर या प्रवाशाला काही आजार होता का, याचाही उलगडा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर होणार आहे. हा प्रवासी सरकत्या जिन्यावर कशामुळे पडला, याची तपासणी पोलीस करीत आहेत. यासाठी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. पोलिसांनी मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या भावाशी संपर्क साधून त्याला या घटनेची माहिती दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Exit mobile version