Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदिवासी भिल समाजाचे भव्य जनआक्रोश मोर्चा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मणिपूर राज्यात आदीवासी महिलांवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी महिलांवर होत असलेले अत्याचारातील संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासह तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने येथील यावल पंचायत समिती कार्यालयापासून तर बु्ऱ्हाणपूर अंकलेश्र्वर या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आदीवासी एकता परिषदच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , यावलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे उपस्थित होत्या. मोर्चाचे आयोजन राज्य संपर्कप्रमुख सुनील गायकवाड , भिकाभाऊ कदम, सदाशिव बोरसे, देविदास मोरे , यशवंत अहीरे, सदाशिव भिल, वंचित आघाडीच्या शमीबा पाटील यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

आदिवासींवर होत असलेले अत्याचार व न्याय मागण्यासाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर येथे विवस्त्र महिलांची काढलेली दिंड व त्यांचेवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच एरंडोल तालुक्यातील बालवस्ती गृहातील मुलींवर झालेला अत्याचार यासह समान नागरी कायदा करू नये, सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील भूमी दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे स्वाभिमान सबलीकरण योजना अंतर्गत शेतजमीन विक्रीसाठी ज्यांनी प्रस्ताव दिलेले आहेत त्या प्रस्तावावर कार्यवाही करून आदिवासी लाभार्थ्यांना जमीन वाटप करावी, तालुक्यातील वडोदा प्र यावल मालोद, चिपखेडा, उंटावत, साखळी, डांभुर्णी, वाघोदा, गिरडगाव, दगडी सातोद, यावल बोरखेडा, हिंगोणा, भालोद, माथन, चिखली, सांगवी बुद्रुक, बोरावल येथे आदिवासी भिल समाजासाठी दफनभूमीकरिता जमीन मंजूर करावी. यासह तालुक्यातील ज्या आदिवासींना अद्यापपर्यंत रेशनकार्ड दिले नाही, त्यांना तात्काळ रेशनकार्ड द्यावे तसेच तालुक्यात ग्रामीण भागात विक्री होत असलेली अवैध व घातक दारू त्वरित बंद करावी, अशा 13 मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

निवेदनावर अशोक पठाण, प्रकाश सोनवणे, अतुल बोरसे, अनिल भिल , संतोष भिल , महेंद्र भिल , सुभाष भिल , अशोक भिल, भुरा भिल , देविदास भिल ,पिंटू भिल, प्रकाश भील, दिनकर भील ,रवींद्र भील, देविदास भील, बापू भील, शिवराम भील, प्रेमलाल बारेला यांचे सह अनेक आदिवासींच्या सह्या आहेत.

Exit mobile version