Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या दाम्पत्याने दुर्गम आदिवासी भागात स्वखर्चाने सुरू केली शाळा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथील खोब्रागडे दाम्पत्याने समाजभान जोपासत आसराबारी या दुर्गम भागात आदिवासी मुलांसाठी स्वखर्चाने शाळा सुरू केली असून नुकताच याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या  डोंगर रांगेत वसलेले गाव आसराबारी धरण (पाडा) म्हणून ओळखला जात आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन गावातील आदिवासीं मुलांसाठी स्वखर्चातून भुसावळ येथील दांपत्याने बिरसा मुंडा या नांवाने आदिवासी चिमुकल्या बालकांसाठी स्कुल सुरू केली आहे. आज सरकार स्वातंत्र्याचा ७५ वें अमृत महोत्सव साजरा करीत असतांना मात्र आज देखील आपल्या देशात अनेक गावांमध्ये शाळाच नाहीत. त्याच प्रमाणे आसराबारी येथे शाळा नव्हती.

 

दरम्यान, या गावातील आदिवासी समाजाची मुले ही शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून मोहराळा येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल यांनी भुसावळ येथील दांपत्य डॉ.दिगंबर खोब्रागडे व त्यांची पत्नी वंशिका खोब्रागडे यांच्याकडे याबाबत माहिती दिली. यावर शासन जोपर्यंत इथे काही प्रयोजन करत नाही तो पर्यंत या मुलांच्या आयुष्याचा विचार म्हणून यांना शिक्षण देवू व त्यांनी स्वखर्चातून शाळा उभारणीचा निर्णय घेतला.

 

या अनुषंगाने आसराबारी या आदिवासी पाडयावर  शाळेचे उद्घाटन स्वखर्चातून बिरसा मुंडा स्कुल या नावाने चालू करण्यात आली. सदर प्रसंगी  भालोद कॉलेज चे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे,वड्री येथील सरपंच अजय भालेराव, परसाडे येथील ग्रापंचायत सदस्य राजू तडवी,सामाजिक कार्यकर्ते सतीश अडकमोल,आसराबारी येथील मळू बारेला, जुवानशिंग बारेला,दिदास बारेला, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. भुसावळ येथील खोब्रागडे कुटुंबाने आदिवासी समाज बांधवांच्या चिमुकल्या मुलांसाठी पाडयावर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Exit mobile version