Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या आग प्रकरणी मालक व व्यवस्थानाविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डब्ल्यू सेक्टरमध्ये झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन बंब, रुग्णवाहिका दाखल झाल्या. सुरुवातीला जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र २ जण मध्ये अडकल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध सुरू होता. त्यावेळी दुपारी दोन वाजता समाधान पाटील या कामगाराचा मृतदेह सापडला. मात्र आणखी एका कामगाराचा शोध लागत नव्हता. त्यामुळे शोध कार्य सुरूच होते. अखेर संध्याकाळी ६ वाजता दुसऱ्या कामगाराचीही मृतदेह सापडला. या स्फोटामुळे जवळच असलेल्या आर.जी. इंडस्ट्रीज या कंपनीलाही झळ बसली आहे.
कंपनीत स्फोट झाला त्या वेळी कंपनीत एकूण २६ जण होते. त्यापैकी २२ जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला. यात अनिता गायकवाड या महिलेसह कपिल बाविस्कर यांना इजा झाली नाही.

कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.

 

Exit mobile version