Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जातीय सलोख्यासाठी पाचोऱ्यात एक हजार सह्यांची मोहीम

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – पोलीस दलातर्फे सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पाचोरा पोलिस प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मिती महिमेचे उद्घाटन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहीमेस पाचोरा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून किमान एक हजार सह्यांचे उदिष्ट पुर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक भुषण वाघ, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, माजी नगरसेवक बशीर बागवान, नसीर बागवान, चंदूशेठ केसवानी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. कमलाकर इंगळे, प्रा. माणिक पाटील, उपप्राचार्य जे. व्ही. पाटील, प्रा. योगेश पूरी, प्रा. सुधाकर कदम, हारुन देशमुख, माजी जि.प. सदस्य राजेंद्र साळुंखे, प्रविण ब्राम्हणे, खंडू सोनवणे, विनोद अहिरे, अमजद खान, एस. के. पाटील, जुल्फिकार बागवान, अॅड. अविनाश सुतार, डॉ. अल्ताफ देशमुख, सुधाकर महाजन, दत्ता बोरसे, संजिता शेख, अशपाक बागवान, पितांबर जाधव आदि पदाधिकारी, महिला, युवक, युवतीसह सर्व स्तरातील विविध पंथ, धर्माचे नागरीक एकत्र, गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे उत्स्फूर्तपणे सह्यांच्या मोहिमेत सामील होवून दाखवून दिले आहे.

यावेळी आ. किशोर पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून पाचोरा मतदार संघातील विविध जाती धर्माचे नागरिकांनी गेल्या आठवड्यात कोणताही अनुचित प्रकार घडू न देता सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचे संबंध जोपासल्याचे दाखवले असून नागरीकांचे मनपूर्वक आभार मानले आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य जे. व्ही. पाटील, प्रा. माणिक पाटील, कमलाकर इंगळे, प्रा. गिरी यांनी पोलिस उपधिक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांचा सत्कार केला, तर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रेम शामदानी यांनी पेढे वाटून पोलिसांचा आनंद व्दिगुणित केला.

Exit mobile version