Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इन्फोसिसला झटका ; ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान

infosys share

 

मुंबई प्रतिनिधी । देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसला मोठा झटका बसला आहे. इन्फोसिसचे शेअरमध्ये मागील सहा वर्षात पहिल्यांदा आज १४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याचं पहायला मिळालं. यामुळे गुंतवणुकदारांचं अवघ्या काही मिनिटांमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झालं.

इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का आणि संस्थापक नारायणमूर्ती यांच्यातील वादाचा फटका याआधी इन्फोसिसला बसला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपानंतर आता कंपनीला मोठा झटका बसला आहे. इन्फोसिस आपल्या उत्पन्नात आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी केला. यामध्ये कंपनीचे काही उच्चपदस्थ असल्याचाही आरोप करण्यात आला. या आरोपाचे पडसाद आज मंगळवारी सकाळी शेअर बाजारात उमटले. मागील आठवड्याच्या शुक्रवारी शेअर बाजारात इन्फोसिसचे मूल्य ७६७.७५ रुपये इतके होते. त्यामध्ये आज सकाळी १४ टक्क्यांची घसरण होत शेअर मूल्य ६४५ रुपयांपर्यंत आले. याआधी १२ एप्रिल २०१३ रोजी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहण्यास मिळाली. त्यावेळी २१.३३ टक्क्यांपर्यंत शेअर घसरले होते. मंगळवारी झालेल्या शेअर घसरणीमुळे इन्फोसिसला आज सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची चर्चा आहे. जानेवारी २००० ते आजपर्यंत १६ वेळेस इन्फोसिसचे शेअर दुहेरी अंकानी घसरले आहेत.

Exit mobile version