Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली. त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात भेट दिली. यावेळी कुटुंबियांशी संवाद साधताना ते म्हणाले, खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे कार्य अप्रतिम आहे.सर्वप्रथम बहिणाबाईच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. बहिणाबाईंचे कार्य उल्लेखनीय असल्याचे याप्रसंगी डॉ. शोभणे यांनी सांगितले.

बहिणाबाईंच्या संसारोपयोगी वस्तू पाहून ते भारावले. यावेळी त्यांनी बहिणाबाईंनी वापरलेल्या व सध्या संग्रहित असलेल्या वस्तू पाहिल्या. या वस्तू पाहून ते रोमहर्षित झाले. यावेळी बहिणाबाई चौधरीच्या नात सून श्रीमती पद्माबाई चौधरी, पणतू देवेश चौधरी, आमदार सुरेश दामू भोळे, माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर सुनील खडके या सर्वानी बहिणाबाईंचे पुस्तक व श्रीरामचे मंदिर भेट देऊन डॉ. शोभणे यांचा सत्कार केला. याप्रसंगी स्मिता चौधरी, अनिल खडके, पोलीस पाटील प्रभाकर पाटील, सुनील काळे, विशाल चौधरी, मनोज भांडारकर, विवेक जगताप, योगेश शिंपी, अभिजीत भांडारकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version