Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२३ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ  वादातून चॉपरने भोसकुन तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अक्षय अजय चव्हाण वय-२३ रा.पिंप्राळा असे मयताचे नाव  असून यावेळी अक्षय यास वाचविण्यासाठी गेलेला त्याचा मित्र युवराज जाधव यांच्यावरही चॉपरने वार केल्याने तो गंभीर जखमी आहे. त्यालाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोबाईलच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  अक्षय हा त्याच्या मित्रांसह घराजवळ गप्पा मारत होता. यादरम्यान दुचाकीवरून तीन ते चार जण आले त्याला कुठल्यातरी काम सांगून सोबत घेऊन गेले. यानंतर शिव कॉलनीतील देशी दारूच्या दुकानावर अक्षयचा बाळू पवार नामक तरुणासोबत त्याचा वाद झाला. या वादातून अक्षयने बाळूच्या भावाला दगड मारून फेकला याचा राग आल्याने बाळूने अक्षयच्या पोटात चॉपरने सफासफ करून त्याचा खून केला. यावेळी अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र  युवराज मोतीलाल जाधव हा भांडणात पडला असता त्याच्यावरही  वार करून त्यालाही जखमी करण्यात आले.

 

त्यानंतर बाळूसह मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. याच ठिकाणी मद्यप्राशन करत असलेल्या भारत बंडू राठोड या तरुणाने जखमी अवस्थेत पडलेल्या अक्षय यास जिल्हा रुग्णालयात हलवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान जखमी युवराज यालाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मोबाईल वरून हा वाद झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मयत अक्षय हा जैन कंपनीत कामाला होता मात्र तो आज कामावर गेला नव्हता. त्याच्या पश्चात आई रेणुका, वडील अजय भुरा चव्हाण, भाऊ शैलेश असा परिवार आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version