घरात राहून कोरोनाची साखळी खंडित करा : नगरसेवक पाटील यांचे आवाहन

यावल, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत असतांना कोरोनाचा यावल शहर व तालुक्यात प्रवेश झाला आहे. या कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर सर्वानी घरात थांबावे, अत्यावश्यक कामाशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी केले आहे.

यावल शहराला व तालुक्याला कोरोना च्या विळख्यातून सोडवण्यासाठी आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन अथक परिश्रम घेऊन जीवाचे रान करीत आहे. तालुक्यात आलेल्या या आपात्कालीन संकटावर मात करण्यासाठी शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी समर्थपणे प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे असते व आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांना आवाहन करतो की, प्रशासनाने लॉक डाऊनच्या काळात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून अत्यावश्यक काम असेल तर तोंडाला मास्क लावून अथवा रुमाल बांधून घराबाहेर निघावे. कुठलेही कारण नसता अनावश्यक रित्या घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे आपापल्या प्रभागांमध्ये बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयमध्ये पाठवून त्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात राहण्यासाठी प्रोत्साहित करावे व ही कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनास मदत करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या राष्ट्रावर आलेले आपात्कालीन संकटसमयी आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य करावे ही असे भावनिक आवाहन यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी केले आहे

Protected Content