भरभक्कम लीडमुळे जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटलांचा मार्ग सुकर

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना भरभक्कम आघाडी मिळवून देण्याचा लाभ विधानसभेसाठी ना. गुलाबराव पाटील यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अ‍ॅडव्हेंटेज गुलाबराव पाटील

गत विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप व शिवसेनेतील वाद विकोपाला गेले होते. मात्र या लोकसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांचे पुन्हा मनोमीलन झाले. निवडणुकीआधी जळगावात दोन्ही पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी गिले-शिकवे विसरून एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली होती. आणि निवडणुकीच्या प्रचारात तसे झालेदेखील. खरं तर, भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपेक्षा शिवसेनेने जोरदार प्रचार केल्याचे त्या कालखंडात दिसून आले. भाजप नेत्यांनी खासगीत ही बाब मान्यदेखील केली आहे. यामुळे महायुती भक्कम झाल्याचा खूप मोठा लाभ उन्मेष पाटलांना झाल्याचे निकालातून दिसून आले. शिवसेना मजबूत स्थितीत असणार्‍या जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव आणि एरंडोल-पारोळा येथून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले. तर दगाफटका होईल अशी भिती असणार्‍या जळगावातही शिवसेनेच्या साथीमुळे त्यांना लीड मिळाला. आता लोकसभेचा हाच कल विधानसभेत होण्याची शक्यता जास्त आहे. याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीणमध्ये सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना अ‍ॅडव्हेंटेज असल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे.

काय सांगतात आकडे ?

जळगाव ग्रामीण मतदारसंघात धरणगाव तालुका आणि जळगावातही महापालिका हद्द वगळता अन्य गावांचा समावेश होतो. यात जळगाव तालुक्यातून ३६,५७४ तर धरणगाव तालुक्यातून २७,८७६ मतांची आघाडी महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मिळाली. या आकड्यांना अजून थोड्या प्रमाणात विभाजीत करून पाहिले असता या मतदारसंघात १७६ गावे असून एक नगरपालिका; आठ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गण आणि १४३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत १७६ गावांपैकी तब्बल १५५ गावांमध्ये महायुतीला मताधिक्य तर राष्ट्रवादीला ५१ गावांमध्ये अल्प आघाडी (एकूण २४२३ मते) मिळाली आहे. यात धरणगाव शहरातून ५०३६ मताधिक्य महायुतीला मिळाले आहे. जिल्हा परिषद गटनिहाय विचार केला असता, जळगाव तालुक्यात, भोकर-कानळदा (७६५५); ममुराबाद-आसोदा (९३५७); भादली-नशिराबाद (१९१८); चिंचोली-शिरसोली (११२०७) तर म्हसावद-बोरनार (६४३७) अशी आघाडी मिळालेली आहे. तर धरणगाव तालुक्यात, साळवा-साकरे (५७९८); सोनवद-पिंप्री (८९४९); तर पाळधी-बांभोरी (८९४९) असे मताधिक्य लाभले आहे. यातील ममुराबाद-आसोदा; भादली-नशिराबाद आणि चिंचोली-शिरसोली गटातून मिळालेले मताधिक्य हे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारे आहे. तर नशिराबाद शहरातूनही या पक्षाला अतिशय अल्प आघाडी मिळाल्याची बाबही विधानसभेत धोकेदायक ठरू शकते.

कल कायम राहण्याची शक्यता

गुलाबराव देवकर हे लोकसभेत पराजीत झाल्यानंतर जळगाव ग्रामीणमधून पुन्हा रिंगणात उतरणार की नाही याबाबत त्यांनी अधिकृतपणे जाहीर भाष्य केलेले नाही. यातच गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य हे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वारे निर्माण करणारे ठरले आहे. विकासकामांचा झंझावात, मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत असणारा संपर्क तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाळे या जमेच्या बाजू ना. गुलाबराव पाटील यांच्यासाठी स्ट्राँग पॉइंट असल्याची बाब कुणी नाकारू शकत नाही. तर दुसरीकडे देवकर हे दारूण पराभवाने खचले आहेत. यातच लोकसभा निवडणुकीचा कल हा विधानसभेतही बर्‍यापैकी सारखाच राहण्याची शक्यता असल्याने हा निकाल सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मार्ग सुकर झाल्याची ग्वाही देणारा असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

Add Comment

Protected Content