Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी राखून ठेवण्याचे आदेश

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के  करावा, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहे.

 

 

राज्यातील उत्पादकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली आहे. येत्या 30 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात हे  आदेश लागू राहणार आहे.

 

 

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरिता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

 

राज्यातील ऑक्सिजनची गरज वाढली आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने ऑक्सिजन उत्पादित करण्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 80 टक्के पुरवठा हा वैद्यकीय वापराकरिता ठेवावा. तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य द्यायचे आहे. वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याचाही पुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

 

या निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे. ही अधिसूचना 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली  आहे.

Exit mobile version