Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात ७३ व्या स्वातंत्र्यदिनी धावले ७३ धावपटू

swatantryadin run

भुसावळ, प्रतिनिधी | येथील स्पोर्टस अँड रनर्स असोसिएशनने स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमात ‘सद्भावना व स्वातंत्र्य रनमध्ये’ असोसिएशनचे ७३ धावपटू व शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला. सकाळी ६.०० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून सुरू झालेली रन जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीवर वळसा घेऊन पुन्हा डॉ. आंबेडकर मैदानावर येऊन संपन्न झाली. ५ कि.मी.चे नियोजित अंतर धावपटू व नागरिकांनी अतिशय उत्साहात ५० मिनिटांच्या आत व अतिशय शिस्तबद्धरित्या पूर्ण केले.

 

यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ अशा घोषणांनी रनर्सचा आनंद द्विगुणित होत होता. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले असंख्य नागरिक धावपटूंचे स्वागत करीत होते. या रनचे नेतृत्व डॉ. चारुलता पाटील, डॉ.नीलिमा नेहेते व पुनम भंगाळे या महिला रनर्सने केले. सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी रनला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक, कार्यक्रमाचे समन्वयक ब्रिजेश लाहोटी, प्रवीण पाटील, अंकित पोद्दार, निलेश लाहोटी, गणसिंग पाटील, सचिन अग्रवाल, प्रा.संजय भटकर, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गोपाल सोनवणे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

या रनचे महत्त्व म्हणजे लहान मुले व महिलांचा यात उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्याचप्रमाणे पी.सी चौधरी, रामचंद्र झोपे आदी शहरातील वरिष्ठ रनर्स देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रन संपल्यानंतर सर्व धावपटूंना केळी व इतर अल्पोपहार देण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पोलिस विभागाचे कार्यक्रमात खूप सहकार्य झाल्याची भावना प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा पाटील, डॉ.शितल चोरडिया, डॉ. निर्मल बलके, डॉ.मनोहर गायकवाड, सुनील सोनगिरे, अखिलेश कनोजीया, कल्पेश मनवाणी, बिट्टू कुमार, चेतन पाटील यांनी सहकार्य केले.

Exit mobile version