Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंजनी धरणातून ५५ हजार ब्रास गाळ काढला ; धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत होणार वाढ

ed47e422 e947 4970 b6cb f69ace9113be

एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले अंजनी धरण या वर्षी कोरडेठाक झाले आहे. जलाशयाचे संपूर्ण क्षेत्र उघडे पडले आहे. धरणाच्या जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. या क्षेत्रातून गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी गाळ काढून वाहून नेत आहेत. आतापर्यंत सुमारे ५५ हजार ब्रास गाळ काढण्यात येऊन शेतातील जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेतामध्ये टाकण्यात आला आहे. गाळ काढल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या जलाशयाची साठवण क्षमता वाढणार आहे.

 

अंजनी धरण हे एरंडोल तालुक्यातील लाईफलाईन असून या धरणामुळे परीसरातील विहिरींची जलपातळी वाढण्यास व विहिरी चार्ज होण्यास मोठी मदत होते. गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा वाढ होऊ शकली नाही. परिणामी डिसेंबर महिन्यातच धरणाने तळ गाठला. तेव्हापासून शेतकऱ्यांनी कोरड्या झालेल्या जलाशयाच्या क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम सुरु केले. टोळी, एरंडोल, गालापूर, खर्ची बु., रवंजे बु., पिंपळकोठा बु, आदी गावांमध्ये ‘अंजनीचा गाळ’ शेतात पसरविण्यात आला. सादर गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची प्रत सुधारणार असून उत्पन्नात अधिक वाढ होणार आहे असे सांगण्यात आले.

 

जे.सी.बी. व पोकलंड च्या सहाय्याने धरणातील गाळ काढून ट्रक्टरच्या सहाय्याने शेतापर्यंत वाहतूक केली जाते. कासोदा रस्त्याकडील भगतवाडी परिसरात धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ वाहतूक करण्यात आली आहे. याशिवाय इतर भागातूनही गाळ काढण्यात आला आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे गाळ काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Exit mobile version