Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात शिक्षकांच्या दातृत्वातून ५ ऑक्सिजन कन्स्ट्रक्टरचे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाची लाट आली आणि ऑनलाइन शिक्षणास चालना मिळाली. परंतु शिक्षकांचे वेतन थकबाकी असताना चाळीसगाव येथील शिक्षकांनी सर्व अडथळे दूर करीत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून पाच लाखांचा निधी जमा करुन ग्रामीण भागासाठी 5 ऑक्सिजन कन्स्ट्रक्टर उपलब्ध करुन खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

कोरोनाची साथ सुरू असल्याने शाळा, महाविद्यालय हे बंद आहे. त्यात शिक्षकांचे वेतन ठप्प आहे. तरीही सामाजिक भावनेतून चाळीसगाव येथील शिक्षकांनी एक वॉट्स ॲप ग्रुप तयार केला. त्यामार्फत ५ लाखांचा निधी संकलित करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी 5 आॕक्सिजन कॉन्स्ट्रेटराचे लोकार्पण खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षकांच्या हा स्तुत्य उपक्रम उत्तर महाराष्ट्रातील पहिला आदर्श उपक्रम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर , गटशिक्षणाधिकारी विलास भोई व तालुक्यातील विविध शिक्षक संघटना यांच्या संकल्पनेतून शिक्षक बांधव व पंचायत समितीतील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या भरीव दातृत्वातून आजपर्यंत ४ लाख ७५ हजार रुपये निधी जमा झाला आहे. या निधीतून उंबरखेड, तळेगाव, पातोंडा, खेडगाव, लोंढे या ५ ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी ४८ हजार रु.किमतीचे ५ आॕक्सिजन कॉन्स्ट्रेटर खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यांची होती उपस्थितीत

यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती सुनिल पाटील, माजी सभापती संजय पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.देवराम लांडे, बीडीओ नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, सर्व पंचायत समिती सदस्य, केंद्रप्रमुख, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र रणदिवे, शिक्षक सोसायटीचे संचालक अजितकुमार पाटील, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष अजिज खाटीक, कार्याध्यक्ष मनोज राजपूत , उपाध्यक्ष पत्रकार अजय कोतकर, पंकज रणदिवे, चंद्रमणी पगारे आदी उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील यांनी शिक्षक बांधव व अधिका-यांचे कौतुक करतांना उत्तर महाराष्ट्रात एवढा मोठा निधी जमा करणारी चाळीसगाव पंचायत समिती प्रथम आहे. अशी भावना व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी शिक्षक बांधवाच्या दातृत्वातून आमचा ७ लाख रुपये निधी जमा करण्याचा मानस आहे,तो आम्ही निश्चितच पुर्ण करु असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजितकुमार पाटील तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय वाघ यांनी केले.

 

Exit mobile version