Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : रिलायन्स जिओच्या फाईव्ह-जी सेवेची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज आपल्या बहुप्रतिक्षित फाईव्ह-जी सेवेची घोषणा केली आहे. जाणून घ्या विस्तृत माहिती.

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजीत करण्यात आली आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यात रिलायन्सचा ताळेबंद सादर करणार असून यात अनेक महत्वाच्या घोषणा देखील होण्याची शक्यता असल्याने सर्वांचे याकडे अतिशय उत्सुकतेने लक्ष लागून होते. विशेष करून यात रिलायन्सची फाईव्ह-जी सेवा सुरू होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आणि अंबानी यांनी अपेक्षेनुसार, याची घोषणा केली.

रिलायन्स जिओची सेवा टप्प्याटप्प्याने देशभरातील विविध शहरांमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. नुकत्याच झालेल्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधीक बोली लावली होती. यात विशेष करून ७०० मेगाहर्टझ हा फ्रिक्वन्स बँडसाठी जिओने प्रचंड पैसे मोजले आहे. यानंतर जिओने सर्वात पहिल्यांदा ही सेवा करून यात देखील आघाडी घेतली आहे.

दरम्यान, आज मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या रिलायन्सच्या वार्षीक सर्वसाधारण बैठकीत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देशात जिओची फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येत असल्याची मोठी घोषणा केली. संपर्क क्रांतीतील हे महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यात बोलतांना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या दोन वर्षाप्रमाणे यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हर्च्युअल पध्दतीत आयोजीत करण्यात आली आहे. अलीकडेच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आगामी २५ वर्षांसाठी त्यांनी विकासाचा रोडमॅप मांडला. यानुसार, आम्ही रिलायन्सच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. सध्याच्या जागतिक अस्थैर्याच्या कालावधीत भारत दमदारपणे पाऊल टाकत आहे. आपण आधीपेक्षा मजबूत झालेलो आहोत.

रिलायन्स जिओने वुई केअर हे घोषवाक्य स्वीकारले असून या माध्यमातून आम्ही प्रगती करत असल्याचे अंबानी म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, रिलायन्सने आजवरच्या वाटचालीत विश्‍वासार्हता प्राप्त केली आहे. रिलायन्स जिओने यात मोठी भर टाकली आहे. फोर-जी नेटवर्कमध्ये आम्ही आघाडीवर आहोत. तसेच फिक्स्ड फायबर ऑप्टीक नेटवर्कमध्येही आम्ही जिओ फायबरच्या माध्यमातून अग्रेसर आहोत. या क्षेत्रात आम्ही पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, आता याच प्रमाणे आता रिलायन्स जिओच्या माध्यमातून आम्ही फाईव्ह-जी नेटवर्कची सुरूवात करत असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.

अंबानी म्हणाले की, आता अनेक कंपन्या फाईव्ह-जी नेटवर्कच्या सेवेसाठी सज्ज झालेले असले तरी यातील सर्वोत्तम सेवा ही आमचीच असेल. कारण आम्ही जागतिक दर्जाची सेवा पुरवणार आहोत. यासाठी आम्ही प्रचंड तयारी केली आहे. यात देशात आगामी दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तर डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील अगदी कान्याकोपर्‍यात ही सेवा लॉंच झालेली असेल असे अंबानी म्हणाले.

पहिल्या टप्प्यात देशातील मोजक्या महानगरांमध्ये ही सेवा मिळणार असली तरी लवकरच याचा एक हजार शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार असल्याचेही अंबानी म्हणाले. गेल्या महिन्यात फाईव्ह-जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्यानंतर ही सेवा नेमकी कोणती कंपनी सुरू करणार याची उत्कंठा लागली असतांना रिलायन्स जिओने यात बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version