Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार — अमित देशमुख

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्य सरकारला दिलासादायक निर्णय घेतलाय. कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार असल्याची घोषणा देशमुख यांनी केली

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त फर्निचर उभं करणं म्हणजे आरोग्य यंत्रणा नव्हे, असं प्रत्युत्तर एका उद्योगपतीला दिलं होतं. राज्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अपुरे पडण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.

 

राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5 हजार 200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.

 

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्यांच्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठया प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत होणार आहे.

 

“नागरिकांना आवाहन आहे की, शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटयझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे या सुचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ वा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा”, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलंय.

Exit mobile version