Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथील पाणीपुरवठा योजनेसाठी ४६ कोटींची मान्यता

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील पाणी प्रश्न आमदार चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर सादर करून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडविला आहे. दरम्यान, या योजनेसाठी ४६ कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे.

गेल्या कित्तेक दशकापासून पाणीप्रश्न हा प्रलंबित असल्याने पाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर शहर वासीय तोंड द्यावे लागत होते. गेल्या कित्तेक दशकापासून ८ ते १० दिवसांआड पाणी मिळणे, वेळेवर पाणी न येणे, वारंवार तांत्रिक अडचणींमुळे पाणी उशिराने मिळणे, गडूळ पाणी, अशुद्ध पाण्यामुळे वाढती रोगराई याने शहर वासीय चांगलेच हैराण झाले होते. शहरवासियांनी यासाठी अनेकदा हंडा मोर्चा, आंदोलने देखील केली मात्र त्याचे काहीही फलित शहर वासियांना प्राप्त झाले नाही. आजपावेतो शहर वासीय या अडचणींना सामोरेच जात आहेत.

या सर्वच अडचणींतून शहरवासीयांना मुक्त करावे व शहरात शिरपूर पॅटर्न राबवून शुध्द पाणी व वेळेवर पाणीपुरवठा उपलब्ध करून शहराचा कायमचा पाणीप्रश्न दूर व्हावा हि दूरदृष्टी आमदार  चिमणराव पाटील यांची आमदार झाल्याचा पहिल्या दिवसापासूनच होती.  त्याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजना मंजुर होण्यासाठी लागणार विलंब, त्यांमधील त्रुटी, उद्भवणाऱ्या अडचणी याची सविस्तर माहिती आमदार  चिमणराव पाटील यांनी जाणून घेतली. यानंतर या सर्वच त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आ.पाटील यांनी दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी तातडीने समन्वय समितीची बैठक आयोजित केली व या बैठकीत पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी उद्भवणाऱ्या त्रुटी व अडचणींचा पूर्ततेसाठी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या.

संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत तातडीने पूर्तता पूर्ण केली व सदरील परिपूर्ण प्रस्ताव आमदार  चिमणराव पाटील यांनी शासन स्तरावर सादर करून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पत्रव्यवहार करून आमदार  चिमणराव पाटील यांनी या योजनेमुळे शहरवासियांचा कायमचाच पाणीप्रश्न सुटणार असल्याचे मंत्री यांच्या लक्षात आणून दिले. तद्नंतर या प्रस्तावाची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी तातडीने दखल घेत आ.चिमणराव पाटील व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांना आपल्या शासकीय दालनात बोलावून पारोळा शहरासाठी तब्बल ४६ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रशासकीय मान्यता आबासाहेब व दादासाहेबांच्या हाती प्रदान केला.

या योजनेचा मंजुरीमुळे पारोळा शहराचा कायमचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने या निर्णयामुळे शहरातील जनमानसात आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून शहर वासियांनी आमदार  चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे मनस्वी आभार मानले आहेत. तसेच या मंजुरीच्या अनुषंगाने आमदार  चिमणराव पाटील व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी मतदारसंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे नगरविकासमंत्री  एकनाथजी शिंदे यांचे जाहीर आभार मानले.

Exit mobile version