Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात ३० जवान शहीद

जम्मू (वृत्तसंस्था) काश्मीर पुन्हा एकदा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्याला लक्ष्य केले असून आयईडी स्फोटात ३० जवान शहीद तर अनेक जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून हल्ल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून, 20 हून अधिक जवान जखमी आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गुरुवारी पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बस होत्या. एकूण अडीच हजार जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जम्मूवरुन श्रीनगरला हा ताफा जात होता.

Exit mobile version