Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात कोरोना संसर्गचा दर २४ टक्के- फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा दर वाढून जवळपास २४ टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलै महिन्यातील आकडेवारीच्या आधाराने त्यांनी हा दावा करणारे ट्विट केले आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचा दर २३ ते २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रतिच्या आधारे महाराष्ट्र आणि दिल्लीतील कोरोना चाचण्यांचा तुलनात्मक लेखाजोखा मांडला आहे. मुंबईत संसर्गाचा दर २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. त्यातच, चाचण्यांची संख्या अतिशय कमी. १ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ ५५०० चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच असल्याचा निष्कर्ष फडणवीस यांनी मांडला आहे. तर तुलनेत दिल्लीत कोरोना आटोक्यात येत असल्याचंही ते म्हणाले. तेथे संसर्गाचा दर ३० ते ३५ टक्क्यांहून आता ६ टक्क्यांवर आलेला आणि कोरोना बळींच्या संख्येतही घसरण झाली आहे. तरीही, चाचण्यांची संख्या दररोज कायम असल्याचं सांगत, दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच, असेही फडणवीस यांनी म्हटलंय. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा हेच असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version