Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात २२ हजार शिक्षकांची भरती होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित शाळांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेली मुदत २ फेब्रुवारीला संपली आहे. राज्यात या टप्प्यात २२ हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार तर उर्वरित जवळपास १३ हजार पदे जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील आहेत.

राज्यातील सव्वालाख शाळांमध्ये (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) ६७ हजारांपर्यंत शिक्षक कमी आहेत. तरीदेखील या टप्प्यात २२ हजार पदांची भरती होईल. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के तर खासगी अनुदानित शाळांमध्ये ८० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. खासगी अनुदानितसह जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पदभरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे.

खासगी शाळांना एका रिक्त जागेसाठी तीन उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षकांची निवड गुणवत्तेनुसार थेट होणार आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी घोषणा झालेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षक भरतीची कार्यवाही लवकर व्हावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. या भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला पावणेसहाशे शिक्षक मिळणार आहेत.

Exit mobile version