Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिवाळी साजरी करतांना खबरदारी घ्या : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करू नये असे आवाहन करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर करत त्यांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

 

 

दीपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरीकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरीकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास करुन उत्सव साजरा करावा.
सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘‘ब्रेक दि चेन’’ अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच स्वच्छतेयाबाबत जनजागृती करण्यात यावी. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होणाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील पालन करणे आवश्यक राहील. या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.

Exit mobile version