Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उ.प्र.त कॉंग्रेसने घालवल्या महाआघाडीच्या १० जागा

Untitled design 241

लखनऊ (वृत्तसंस्था) समाजवादी व बहुजन समाज पक्षाशी जुळवून न घेता प्रियांका गांधीच्या करिष्म्यावर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचा उत्तर प्रदेशात दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला यूपीमध्ये केवळ एक जागा जिंकता आली आहे. उलट स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसनं सपा-बसपा महाआघाडीच्या १० जागा पाडून भाजपच्या विजयाला हातभार लावल्याचे समोर आले आहे.

 

उत्तर प्रदेशात महाआघाडी करताना सपा, बसपा व राष्ट्रीय लोकदलाने काँग्रेसला परस्पर दोन जागा सोडल्या होत्या. मात्र, काँग्रेसनं महाआघाडीत जाण्याऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. प्रियांका गांधी यांना प्रचाराच्या आखाड्यात उतरवून हवाही निर्माण केली होती. मात्र, काँग्रेसला गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ अमेठीही वाचवता आला नाही. उलट भाजपला टक्कर देणाऱ्या महाआघाडीच्या सात जागा काँग्रेसमुळे पडल्या आहेत. तिथे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात मनेका गांधी यांचाही समावेश आहे.

सुलतानपूरमध्ये भाजपच्या मनेका गांधी यांना ४५.९ टक्के, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे चंद्रभद्रा सिंह यांना ४४.४ टक्के मतं मिळाली. याच जागेवर काँग्रेसकडून लढणाऱ्या संजय सिंह यांनी ४.२ टक्के मतं घेतली. इथं काँग्रेसनं महाआघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दिला असता तर मनेका गांधी यांचा सहज पराभव झाला असता. बदायू, बांदा, बाराबंकी, बस्ती, धौरहरा, मरेठ, संत कबीरनगर, मछलीशहर व सीतापूर या मतदारसंघातही काँग्रेसमुळे महाआघाडीची मतं फुटल्याचं समोर आले आहे. मछली शहरमध्ये भाजपच्या बीपी सरोज अवघ्या १८१ मतांनी निवडून आल्या आहेत. इथे काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या जनाधिकार पार्टीच्या उमेदवाराने महाआघाडीची मतं खाल्ल्याने आघाडीचा उमेदवार पडला आहे.

Exit mobile version