Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका दाखल होणार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत या नवीन रूग्णवाहिका रूग्णसेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय, जळगाव व त्यांच्या अधिनस्त ९ ग्रामीण रूग्णालयांना रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयाने याबाबतचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयास पाठविला‌. एरवी प्रस्ताव पाठविल्यानंतर या प्रस्तावाच्या तांत्रिक मान्यतेस साधारणत: दीड महिना लागतो. मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. धीरजकुमार यांनी गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ घालून देत प्रस्तावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजी या प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली.

तांत्रिक मान्यतेनंतर आता रूग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयास एक रूग्णवाहिका व ग्रामीण रूग्णालय न्हावी (ता.यावल), बोदवड, अमळनेर, एरंडोल, भडगाव, पाचोरा, मेहुणबारे (ता.चाळीसगाव), पहुर (ता.जामनेर) व पिंपळगाव – हरेश्र्वर (ता.पाचोरा) येथे प्रत्येक अशा एकूण १० नवीन रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत. रूग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत १ कोटी ८० लाख ६३ हजार रूपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

या रूग्णवाहिकांचा फायदा गर्भवती महिला, लहान मुले, अपघातग्रस्त व अत्यवस्थ रूग्णांना होणार आहे. असे ही श्री.पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version