Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे राष्ट्रीय लोक न्यायालयात १ हजार ६४८ केसेस निकाली

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथे आज राष्ट्रीय लोक न्यायालयात १ हजार ६४८ केसेस निकाली निघाल्या. यातून एकूण २ कोटी ५८ लाख ८१ हजार ६८२ रुपयांची वसुली झाली.

पाचोरा येथे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांचे विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालय आज दि. १३ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.

सदरहू राष्ट्रीय लोक न्यायालयात वादपूर्ण १ हजार ५२५ केसेसचा निपटारा करत ६९ लाख १० हजार ९३१ रुपये, दिवाणी व फौजदारी १२३ केसेस निकाली निघाल्या. ज्यात १ कोटी ८९ लाख ७० हजार ७५१ रुपये अशा एकूण १ हजार ६४८ केसेस निकाली काढण्यात आल्या. यातून २ कोटी ५८ लाख ८१ हजार ६८२ रुपयांची वसुली करण्यात आली. 

यावेळी कामकाज तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी.बी.औंधकर, एम.जी.हिवराळे, सह दिवाणी न्यायाधीश एल.व्ही.श्रीखंडे, पंच न्यायाधीश अॅड.कविता रायसाखडा, अॅड.पी.डी.पाटील, अॅड.चंद्रकांत पाटील, अॅड.प्रियंका न्याती, अॅड.राजेंद्र वासवानी, अॅड. ज्योती पाटील यांनी कामकाज पाहिले.

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजकुमार धस, वकील मंचचे अध्यक्ष अॅड.प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंदनसिंग राजपुत, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, जेष्ठ वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका विधी सेवा समिती पाचोरा चे अध्यक्ष जी.बी.औंधकर यांनी आवाहन केले की, यापुढे होणाऱ्या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोकन्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. असे आवाहन केले.

लोकन्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ पाचोराचे अध्यक्ष व सभासद वकील मंडळी, तसेच पंचायत समिती पाचोरा चे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, बँक कर्मचारी, दूरसंचार विभाग, महावितरण कंपनीचे कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक विजय बाविस्कर, कनिष्ठ सहाय्यक दिपक तायडे व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version