Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

1 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । १ एप्रिलपासून विमान प्रवास महाग होणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने  विमानचालन सुरक्षा शुल्कात  वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे १ एप्रिलपासून विमान प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

 

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने विमानचालन सुरक्षा शुल्कात देशांतर्गत प्रवाशांसाठी ४० रुपये दरवाढ केली आहे. विमानचालन सुरक्षा शुल्काचा वापर विमानाच्या सुरक्षेसाठी केला जातो. आता एव्हिएशन सिक्युरिटी फी म्हणून देशांतर्गत प्रवाशांना २०० रुपये द्यावे लागतील, आधी यासाठी १६० रुपये मोजावे लागत होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १२ डॉलर द्यावे लागतील. एक एप्रिलपासून नवे दर लागू होतील.

 

विमानाने प्रवास करणाऱ्या जवळपास प्रत्येक प्रवाशाला ही फी द्यावी लागते. पण, २ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, ऑन ड्युटी एअरलाइन कर्मचारी किंवा एकाच तिकीटाद्वारे कनेक्टिंग फ्लाइट पकडणारे प्रवाशी अशा काहींना यात सवलत मिळते. दर सहा महिन्यांनी विमानतळ सुरक्षा शुल्काचा आढावा घेतला जातो. सप्टेंबर २०२० मध्ये एव्हिएशन सिक्युरिटी फी १५० रुपये होती, त्यात १० रुपयांची वाढ करण्यात आली आणि फी १६० रुपये झाली, आणि आता ही फी २०० रुपये झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी फी ४.९५ डॉलरवरुन ५.२० डॉलर करण्यात आली होती, आणि आता ही फी १२ डॉलर झाली आहे.

Exit mobile version