Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

​सोनिया गांधींनी बोलवली वरिष्ठ नेत्यांची बैठक

 

 

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । संघटनात्मक निवडणुकीतून पक्षाचा अध्यक्ष निवडण्यावर एकमत घडवण्याचे प्रयत्न कॉंग्रेसमध्ये सुरू झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी १९ डिसेंबरला पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीला सोनिया यांनी कॉंग्रेसमधील नाराज ज्येष्ठ नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे. या नेत्यांनी अलिकडेच पक्षात कायमस्वरुपी अध्यक्ष निवडून संघटनेत बदल करण्याची मागणी करणारं पत्र लिहिलं होतं. या बैठकीत सोनिया गांधी पक्षाच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, असं सांगण्यात येतंय.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अलिकडेच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. आपण स्वतःहून नाराज नेत्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करावी, असा सल्ला कमलनाथ यांनी सोनियांना दिल्याचं बोललं जातंय. कारण नाराज नेते हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांची स्वतःची एक राजकीय पत आहे.

सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शनिवारी महत्त्वाची बैठक झाली. कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्षांची निवडणूक जानेवारीच्या अखेरीस होणार असून पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे याला दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी १९ तारखेला म्हणजे शनिवारच्या बैठकीत नाराज असलेल्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित केलं आहे. या नेत्यांना त्या भेटतील आणि त्यांची नाराजी दूर करून पक्षाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील.

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार होणार नाहीत, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत गांधी कुटुंबाच्या एखाद्या निष्ठावान नेत्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचं निधन झालं आहे. अशा परिस्थितीत सोनिया यांनीही एक सेनापती निवडण्याची गरज आहे, जो पक्षाच्या वरिष्ठ आणि युवा नेत्यांमध्ये समतोल साधू शकेल.

सोनिया गांधी यांचं वय आणि प्रकृती पाहता पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करावीच लागणार आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी दुसऱ्यांदा पक्षाची सत्ता हाती घेतली आहे. आता पण वय आणि प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना स्थानिक पातळीवर सक्रिय भूमिका निभावता येत नाहीए. यामुळे पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष निवडावा लागणार आहे.

 

Exit mobile version