Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर

 

नाशिक : वृत्तसंस्था । ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी ही माहिती दिली आहे.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती.

या साहित्य समंलेनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे व जनार्दन वाघमारे ही नावं चर्चेत होती. अखेर डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव निश्चित झालं आहे.

हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, यासाठी गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने प्रयत्न केले होते. या वर्षी सार्वजनिक वाचनालय इच्छुक नसल्याचे कळल्यावर लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न करता आपला प्रस्ताव सादर केला होता. दिल्लीतील मराठी जनांना मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून सरहद्द संस्थेने मागील वर्षी आयोजनाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा उस्मानाबादची वर्णी लागली होती. किमान यंदातरी आपला विचार होईल असे दिल्लीकरांना वाटत होते. संमेलन नाशिकला मिळतेय हे समजल्यावर सरहद्द संस्थेने महामंडळाला प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र पाठविले होते. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले.

Exit mobile version