Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

 

 

नाशिक : वृत्तसंस्था । अखेर आज नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे.

 

 

येथे होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं संमेलन घ्यावे की पुढे ढकलावे असा पेच संयोजकांसमोर उभा राहिला होता. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय सुरू होता.

 

नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत  ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे हे संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याची माहिती दिली. “कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असं महामंडळानं ठरविलं होतं. पण, नोव्हेंबर २०२०च्या मध्यापासून कोरोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये आटोक्यात आले आणि महाराष्ट्राने कोरोनावर मात केली असं चित्र निर्माण झालं. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचं जाहीर केलं होतं,” असं मडळानं म्हटलं आहे.

 

“संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, तो कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उलट प्रभाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती मंडळाने दिली आहे.

Exit mobile version