Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

८० टक्के लोक कोरोनापासून दूर ; मात्र प्रसार गंभीर

अलिबाग, वृत्तसंस्था । राज्यातील ८० टक्के लोकांना करोनाचे लक्षणे नाहीत. त्यांच्यात तसे लक्षणेही दिसत नाहीत. मात्र, त्यांच्या माध्यमातून करोनाचा होणारा प्रसार गंभीर आहे. त्यामुळे अशा रुग्णांकडे दुर्लक्ष करू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे आणि डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज ८० टक्के रुग्णांना करोनाची लक्षणे नाहीत. पण ते या आजाराचे संक्रमण करू शकतात.

त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये. करोनाच्या विषाणूला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरू ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

करोनाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त, सामाजिक अंतर, मास्कचा वापर, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच करोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा यंत्रणेने करोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन केले. तर, करोनाला दूर ठेवूनच हरविणे शक्य आहे.

करोना झाल्यानंतर उपचार करून घेण्यापेक्षा तो होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेवटी सध्याच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सध्याची अर्थव्यवस्था काहीशी कमकुवत झाली असली तरी सर्वजण मिळून या परिस्थितीवर निश्चित मात करू, असा विश्वास व्यक्त करतानाच गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षितपणे साजरा करूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

राज्यातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे, ही बाब समाधानकारक आहे. गरजूंना अधिक चांगली रुग्ण सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसेच येणारा गणेशोत्सव शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीतच साजरा करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. राज्यात सध्या २८५ शासकीय तर ८४ हजार ३६९ खाजगी कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

Exit mobile version