Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

५ महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी साडे सहा कोटी रुपयांचे कर माफ

 

मुंबई वृत्तसंस्था ।  एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी अमेरिकेतून आणाव्या लागणाऱ्या औषधांवरील साडे सहा कोटी रुपये कर माफ करण्याचा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे

 

या बद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात माहिती फडणवीस यांनी पत्राचा फोटो पोस्ट करत दिली आहे.

 

तिरा कामत या मुंबईतील पाच महिन्यांची बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. क्राऊड फंडींगच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रूपये गोळा करण्यात आले आहेत. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून भारतामध्ये आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे साडेसहा कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

 

पालकांच्या मागणीनंतर तिरा कामतच्या उपचारासाठी अमेरिकेतून मागवण्यात येणाऱ्या औषधाला करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, मंगळवारी नऊ फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला.

 

 

 

पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तिरा कामत हिचे प्राण वाचतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणामध्ये तातडीने लक्ष घातल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तिरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. या करमाफीमुळे तिरावरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून तिच्या पालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version