Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

५५ वर्षीय दोषीच्या शिक्षेचा ज्युवेनाईल बोर्डाकडे वर्ग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एक ५५ वर्षीय व्यक्ती खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर या व्यक्तीची शिक्षा ज्युवेनाईल बोर्डनं निश्चित करावी, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी हे प्रकरण ज्युवेनाईल बोर्डाकडे वर्ग केलंय. या व्यक्तीनं १९८१ साली हत्या केली होती. घटना घडली तेव्हा दोषी व्यक्ती अल्पवयीन होता, यामुळेच त्याची शिक्षी ज्युवेनाईल बोर्डानं निश्चित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.

न्या एस अब्दुल नझीर आणि न्या संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेशच्या बहराइच न्यायालयानं सुनावलेली शिक्षा रद्द केलीय. बहराइच न्यायालयानं दोषीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा पुढे अलाहाबाद उच्च न्यायालयानंही कायम ठेवली होती. १९८६ च्या ‘ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट’नुसार १६ वर्षांवरील व्यक्तींना अल्पवयीन मानलं जात नव्हतं, असंही स्पष्टीकरण अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलं होतं.

सुनावणी २०१८ मध्ये पार पडली होती आणि ‘ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट २०००’ अस्तित्वातही आला होता. संशोधित कायद्यात अल्पवयीन व्यक्तीचं वय १८ निर्धारीत करण्यात आलं होतं. या कायद्यानुसार, गुन्ह्याच्या वेळी एखाद्या आरोपीचं वय १८ वर्षांहून कमी असेल तर त्याच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी ज्युवेनाईल जस्टिस कोर्टात केली जाईल.

दोषी सत्य देव याचं वय गुन्ह्याच्या दिवशी म्हणजेच, ११ डिसेंबर १९८१ रोजी १६ वर्ष ७ महिने आणि २६ दिवस होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खन्ना यांनी ‘गुन्ह्याच्या दिवशी सत्य देव १८ वर्षांहून कमी वयाचा होता, यामुळे त्याला ज्युवेनाईल मानताना त्याला २००० च्या सुधारित कायद्याचा फायदा दिला जाईल. कोणत्याही दोषीला त्याला ज्युवेनाईल असल्यानं मिळणाऱ्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही’ असा निर्वाळा दिलाय.

Exit mobile version