Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

४४ लाखांहून अधिक कोरोना लसी वाया

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात ११ एप्रिलपर्यंत लसींचे तब्बल ४५ लाख डोस वाया गेल्याचा खुलासा माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने केलाय.

 

लस वाया घालवणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये पाच राज्य आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. माहिती अधिकाराअंतर्गत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १० कोटी ३४ लाख लसींचा योग्यपद्धतीने वापर करण्यात आला आहे तर ४४ लाख ७८ हजार लसी न वापरताच फेकून द्याव्या लागल्या आहेत. एकणू २३ टक्के लसींचे डोस वाया गेल्याची माहिती या आकडेवारीतून समोर आलीय.

 

अनेक राज्यांमध्ये लस तुटवडा जाणवत असतानाच अनेक राज्यांमध्ये लसींचा योग्य पद्धतीने वापर न होता त्या वाया जात आहेत.  ११ एप्रिलपर्यंत ४४ लाख ७८ हजार लसी वाया गेल्या आहेत. तामिळनाडूमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लसींपैकी तब्बल १२.१० टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मणिपूर तर पाचव्या क्रमांकावर तेलंगण राज्याचा सामावेश आहे. हरयाणामध्ये ९.७४ टक्के, पंजाबमध्ये ८.१२ टक्के तर मणिपुरमध्ये ७.८० टक्के लसी वाया गेल्या आहेत. तेलंगणला पाठवण्यात आलेल्या लसींपैकी ७.५५ टक्के लसी न वापरताच फेकू द्याव्या लागल्यात.

 

देशातील काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असेही आहेत ज्यांनी लसींचा अगदी योग्य पद्धतीने वापर करत कमीत कमी लसी वाया जातील याची खबरदारी घेतली आहे.केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोरम, गोवा, दमण आणि दीव, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीपसारख्या ठिकाणी लसींचा अधिक योग्य पद्धतीने वापर करण्यात आला आहे.

 

काही राज्यांमधील वाया गेलेल्या लसींचा आकडा जास्त असला तरी त्यांना पुरवण्यात आलेल्या लसींच्या तुलनेत टक्केवारीच्या हिशोबाने तो आकडा सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये लाखोंच्या संख्येने लसी वाया गेल्या असल्या तरी एकंदरित विचार करता या राज्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचं दिसत आहे.

 

देशामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला. सध्या देशात ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण केलं जात असून १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आलीय.

Exit mobile version