Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

४२ कोटींच्या कामांना मंजुरी, शहरातील विकासकामे मार्गी लागणार!- महापौर (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या विकासकामांसाठी शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत २०१९ मध्ये ४२ कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव मंजूर निधीतील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मक्तेदाराला कामांचे कार्यादेश देणे रखडले होते. जळगावच्या विकासासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.सुरेश भोळे, आ.चंदूभाई पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली असून मक्तेदार श्रीश्री एबीडब्ल्यू जेव्ही या मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले असून लवकरच पुढील विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, कुलभूषण पाटील, दिलीप पोकळे, चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भारत सपकाळे, गजानन देशमुख, कुंदन काळे, उत्तम शिंदे, इंद्रजीत राणे आदी उपस्थित होते.

प्रमुख रस्त्यांची कामे आणि इतर विकासकामे मार्गी लागणार
४२ कोटींच्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि इतर विकासकामे मिळून जवळपास ११७ कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहरात एकाच वेळी अनेक कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

स्वतंत्र खात्यात ५.१० कोटी निधी वितरित
जळगाव मनपासाठी ४१.९५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यात शासनामार्फत प्रकल्पाच्या ७० टक्के म्हणजे २९.३६५ कोटींचे अनुदान असणार आहे. तसेच मनपाचा हिस्सा ३० टक्के म्हणजेच १२.५८५ कोटी असणार आहे. संपूर्ण योजनेच्या कामासाठी मनपाने बँकेत स्वतंत्र खाते उघडले असून मनपाने स्वतःच्या हिश्शातील ५.१० कोटींचा निधी त्या खात्यात वितरित करण्यात आला असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली.

रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत वर्षभरात काम पूर्ण करावे
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील विकासकामांसाठी ४२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून मक्तेदाराला कार्यादेश देखील निर्गमित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता रस्ते दुरुस्तीची कामे करणे अत्यंत आवश्यक असून रस्ते दुरुस्तीच्या कामांचा प्रथम प्राधान्यक्रमाने करणेबाबत मक्तेदाराला आदेश करावे, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच कामे पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षे असली तरी ती वर्षभरात पूर्ण करावी अशी विनंती महापौरांनी मक्तेदाराला केली असता शासनाकडून निधीची पूर्तता जशी होईल तसे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

Exit mobile version