Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

३ मे नंतर स्थानिक परिस्थिती पाहून शिथीलता मिळणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी । ३ मे नंतर लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत देतांना स्थानिक परिस्थिती पाहून यात शिथीलता देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी एक वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी प्रारंभी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बलीदान करून आपण मुंबई मिळवली आहे. आज हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करतांना मनात उचंबळून आलेल्या भावना व्यक्त करता येत नाही. माझे आजोबा, वडील व काका यांचा या लढ्यात महत्वाचा भाग होता. त्यांना वंदन करून ठाकरे यांनी आपले मनोगत सुरू केले. ते म्हणाले की, विद्यमान सरकार स्थापन झाले होते तेव्हाच राज्याचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन केले होते. मात्र आताच्या आपत्तीमुळे हे शक्य झाले नाही. आज हिरक महोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी सर्वांच्या सहकार्याने आपण ही लढाई जिंकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सध्या लॉकडाऊन सुरू असले तरी याला सिंगापूरचे पंतप्रधानांनी सर्कीट ब्रेकर म्हणून दिलेला शब्ददेखील योग्य असल्याचे ते म्हणाले.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या तरी सौम्य लक्षणे असणारे पेशंट समोर येत असल्याची बाब त्यातल्या त्यात दिलासादायक आहे. कोविड योध्यासाठी केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. खासगी डॉक्टर्स, दवाखाने, रूग्णालये यांनी समोर येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हेंटीलेटर लागले की रूग्ण गेला असा समज चुकीचा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तीन तारखेनंतर रेडझोन मध्ये काळजी घेण्याची गरज आहे. तेथे काहीही शिथीलता देणे धोक्याचे आहे. ऑरेंज झोनमध्ये देखील काळजी घेतली जात आहे. तर ग्रीन झोनमध्ये आपण आधीच बर्‍याच प्रमाणात शिथीलता देण्यात आलेली आहे. यासोबत राज्या-राज्यांमध्ये लोकांच्या आदान-प्रदान केली जाणार आहे. राज्यातील राज्यात अडकून पडलेल्या लोकांना स्थानिक जिल्हाधिकार्‍यांशी बोलून त्यांना सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. आजवर कृषीची कामे सुरू असून ते आगामा काळातही चालू राहणार आहे. कृषी मालावरही कोणतेही निर्बंध नव्हते. मात्र झुंबड होता कामा नये असे त्यांनी सांगितले. घाबरण्यासारखे काहीही नाही. मात्र काळजी घेतलीच पाहिजे असे त्यांनी बजावले. जिथेही हॉटस्पॉट असतील तिथे डॉक्टरांचे टास्कफोर्स कार्यरत असणार आहे.

Exit mobile version