३१ मार्चच्या आत कामावर या !

३१ मार्चच्या आत कामावर या !
मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा  – एसटी कर्मचाऱ्यांचा संप पाच महिन्यापासून सुरु आहे, यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून या संपामुळे सर्वाचेच नुकसान होत आहे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अन्य  मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही देत, ३१ मार्चच्या आत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधिमंडळात केले.

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत, संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका मांडण्याच्या सूचना दोन्ही सभागृह सभापती व अध्यक्षांनी दिल्या नुसार परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी माहिती दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८%, घरभाडे भत्ता ८%, १६ % आणि २४% करण्यात आला. तसेच मूळ वेतनात सेवाकालावधीनुसार २५०० ते ५००० अशी वाढ करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारणपणे ७००० ते ९००० रुपये वेतनवाढ झाली आहे, ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. नोकरीची हमीसह दर महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन आदी निर्णयांची माहिती मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहात दिली.

एसटीच्या संपामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. अशा विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, असे सांगून कृती समिती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असूनही कर्मचारी संपावर ठाम असून त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास बंदी नाही. त्यांचे निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती या सारख्या कारवाया आम्ही मागे घेतल्या आहेत. त्यामुळे ३१मार्च २०२२ पर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन पुन्हा मंत्री अनिल परब यांनी केले.

Protected Content