Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२८ तासात बांधली १० मजली इमारत

 

बीजिंग : वृत्तसंस्था । आता चीनने अवघ्या २८ तासात १० मजली इमारत उभी करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे प्रत्येक जण हे कसं शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित करत आहे

 

चीनमध्ये तंत्रज्ञान आणि त्याचे प्रयोग सर्वश्रूत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन दरवेळी नवनवे प्रयोग करून आश्चर्याचा धक्का देत असते.  खरं तर एखादी इमारत उभी करायची असल्यास त्याची पायभरणी करण्यासाठी आठवडा जातो. त्यामुळे २८ तासात इमारत उभी केल्याच्या व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नाही.

 

चीनच्या चांग्शा शहरात ही इमारत बांधण्यात आली आहे. या इमारत बांधणीचा व्हिडिओ यूट्यूबवर १३ जूनला टाकण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पाच मिनिटाच्या व्हिडिओत इमारत बांधणीची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. चीनमध्ये एका कंपनीने २८ तास आणि ४५ मिनिटात १० मजली इमारत उभारली आहे. ब्रॉड ग्रुपने ही कामगिरी केली आहे. या इमारत उभारणीसाठी डेव्हलपर्सने ‘लिव्हिंग बिल्डिंग सिस्टम’चा वापर केला आहे. बोल्ट आणि मॉड्यूलरच्या सहाय्याने ही इमारत उभारली आहे.

 

 

प्री फ्रॅब्रिकेटेड कंस्ट्रक्शनचा वापर केला असून या तंत्रज्ञानाचा वापर करणं खूप सोपं आहे. ब्रॉड ग्रुपच्या कारखान्यात इमारत मॉड्यूल तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर साहित्य मोठ्या कंटेनरमध्ये भरून इमारत उभारणी करणाऱ्या जागेवर नेण्यात आलं. तिथे त्याची जोडणी केली गेली. इमारत उभारल्यानंतर त्यात वीज आणि पाण्याची जोडणी केली आहे. आता ही इमारत लोकांना राहण्यासाठी सोपवली जाणार आहे.

 

इमारत उभारणीत स्टील स्लॅबचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आहे. पारंपरिक स्लॅबच्या तुलनेत हा १० पट हलका आणि १०० पट मजबूत असल्याचा दावा आहे. त्याचबरोबर भूकंपातही ही इमारत  निर्धोक राहणार असं सांगण्यात येत आहे.

 

Exit mobile version